नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी इमारतीला गळती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/whatsapp-image-2018-06-21-at-5.55.26-pm_20180698463.jpeg)
पुणे – पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीचा आज (गुरुवारी) उदघाटन समारंभ आयोजित केला होता. मात्र, पहिल्याच पावसामुळे इमारतीमध्ये पाणी गळायला सुरुवात झाली. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केल्यानंतर अनेक गोष्टींची पूर्तता न झाल्याने नाराजीही व्यक्त केली.
पुणे महापालिकेच्या नूतन इमारतीची आधीच अर्धवट काम असताना इमारतीच्या उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप होवू लागला आहे. सत्ताधारी भाजपने या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे झेंडे आणि फलकबाजी करून हा भाजपचा इव्हेंट असल्याचे दाखवून दिले आहे. कार्यक्रम सुरु होण्यास काही तास बाकी असताना इमारत आणि परिसरात तयारीची लगबग सुरु आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापालिकेच्या इमारतीची पाहणी केली आणि इमारतीची कामे अर्धवट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते महापालिकेच्या नव्या इमारतीच्या आज (गुरुवार) होणाऱ्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची “इव्हेंट’ करण्याची भूमिका स्पष्ट झाली आहे.