धर्मादाय व खासगी रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करा : आमदार लक्ष्मण जगताप
पिंपरी । प्रतिनिधी
राज्यातील सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने सर्व धर्मादाय तसेच नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ई-मेल केलेल्या पत्रात म्हटले आहे, “सर्वसामान्य गरीब गरजू नागरिकांना आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य याजोना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन महत्त्वाच्या योजना आहेत. या योजना पुण्यातील काही नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्ण या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव घेताना दिसत आहेत. त्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळत आहे.