देहूरोड उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वाकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/3dehuroad.jpg)
देहू – पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे उड्डाण पुलाचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. दिवाळीपूर्वी या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोडदरम्यान महामार्ग रुंद असल्याने अनेक अपघात झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून देहूरोड शहरातील विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी आंदोलन करून महामार्गाचे रुंदीकरण आणि शहरात उड्डाण पुलाची मागणी केली. त्यानुसार, गेल्या वर्षी निगडी ते देहूरोडदरम्यान महामार्गाचे रुंदीकरण सुरू झाले. रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर, देहूरोड शहरातून एक किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाचेही काम सुरू केले आहे. पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचे ठेकेदाराच्या वतीने सांगण्यात आले.
या पुलाचे काम टी ॲण्ड टी इन्फ्रा कंपनीकडून करण्यात येत आहे. सुमारे ३४ कोटी रुपये निधी मंजूर आहे. दोन ते तीन ठिकाणी जोड आणि स्लॅब टाकणे बाकी आहे. दिवाळीत काम पूर्ण होणार असून, तो वाहतुकीसाठी पूल खुला होणार आहे.
आमदार बाळा भेगडे म्हणाले, की महामार्गाचे रुंदीकरण झाले असून, पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.