देशाप्रती एकनिष्ठ राहून देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्याचा पालिका कर्मचा-यांनी केला संकल्प
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/DSC_8242.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देण्याचा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आज महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त हर्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर संविधानाच्या प्रास्तविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करीत असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त करून आपल्या देशाप्रती एकनिष्ठ राहून देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्याचा सामुहिक संकल्प देखील यावेळी करण्यात आला.
दरम्यान, पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच या पुतळ्याच्या प्रांगणातील भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेच्या कोनशिलेस देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. किशोर खिलारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.