तुकाराम बीज सोहळा उत्साहात साजरा; लाखो भाविकांची उपस्थिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/03/tukaram.jpg)
पिंपरी: संसाराच्या अंगी अवघीच व्यसने । आम्ही या किर्तने शुद्ध झालो ।। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 370 व्या सदेह वैकुंठगमन बीजोत्सव सोहळ्यास सुमारे तीन लाख ते साडेतीन लाख वैष्णव भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र देहूगाव येथे हा सोहळा संपन्न झाला.
राज्याच्या काना-कोप-यातून आलेल्या भाविकांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांनी दुपारी बारा वाजता देहू येथे मनोभावे अभिवादन केले. हा सोहळा पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वीच देहूमध्ये दाखल झालेल्या दिंड्याच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापुजा, हरिपाठ आणि वीणा- टाळ -मृदंग यांच्या साथीत भजन किर्तन व हरिनामाचा जयघोष सुरू होता. बीज यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी आज पहाटे चार वाजल्यापासूनच पांडूरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून वैंकुठगमन मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी वैष्णवांची पाऊले झपाझप गोपाळपूऱ्याकडे पडत होती. सकाळी दहा वाजल्या पासूनच उन्हाचा कडाका जाणवत होता. उपस्थित भाविकांच्या मुखी हरिनाम व अंत:करणात भगवंताला भेटण्याची ओढ चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तळपत्या उन्हाची व वाहणाऱ्या घामाच्या धारांची ते पर्वा न करता भक्तगण तुकोबारायांचे दर्शनासाठी येत होते.
श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला पहाटे तीन वाजल्यापासून नियमित महापूजेने सुरुवात झाली. देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे व विश्वस्त सुनील दिगंबर मोरे, सुनील दामोदर मोरे, जालिंदर मोरे, अशोक निवृत्ती मोरे, अभिजित मोरे आणि जालिंदर मोरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिळा मंदिरातील महापूजा पारंपारिक पद्धतीने करण्यात आली. गोपाळपूरा येथील महापूजा संस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते झाली.
महापूजेनंतर भाविकांना मुख्य मंदिर, शिळा मंदिर व वैकुंठगमन मंदिरात दर्शनाला सोडण्यात आले. मंदिरातील सर्व विधीवत पूजा उरकल्यानंतर सकाळी सव्वादहाच्या सुमारास टाळकरी, सनई, चौघडे, शिंगवाले, ताशे, नगारे, आब्दागिरी, चौरा, गरूडटक्के, जरीपटके यांच्यासह मानकरी कल्याणचे आप्पा महाराज लेले यांची दिडींचे चालक पद्माकर लेले यांच्या दिंडीसह मोठ्या लवाजम्यासह पालखीच्या मुख्यमंदिरातून वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले.
पालखी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वैकुंठगमन मंदिराच्या आवारात असणा-या नांदुरकीच्या झाडाखाली आली. श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशातील बापूमहाराज मोरे देहूकर यांचे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत परंपरे प्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या महानिर्वाण प्रसंगावरील घोटवीन लाळ, ब्रम्हज्ञानी हाती । या अभंगावर किर्तन झाले.
या किर्तनातून त्यांनी सांग किर्तन सांग किर्तन । होय अंग हरि रूप या अभंगाच्या आधारे महाराजांचा या सदेह वैकुंठगमन सोहळ्याचे महत्त्व पटवून दिले. गोपाळपूरा येथे असलेल्या वैंकुठगमन मंदिर व नांदुरकीच्या झाडाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. किर्तन संपल्यावर दुपारी बारा वाजता बोला पुंडलिका वरदा हारी विठ्ठल, असा हरिनामाचा व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी येथील नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली.
आम्ही जातो आमच्या गावा । या अभंगाचे गायन करीत श्री संत तुकाराम महाराजांना मनोभावे अभिवादन केले. येथील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे रवाना झाली आणि त्याच वेळी उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. हा बीजोत्यव सोहळा पार पडल्या नंतर येथील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांग लावली होती. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात प्रथे प्रमाणे उपस्थित दिंडीकरी, फडकरी, मानकरी यांना मानाचे फेटे व नारळ प्रसाद देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य मंदिरात दर्शनबारी मंडपातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते.
या सोहळ्यास मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अप्पर तहसिलदार गितांजली शिर्के, अतिरिक्त गटविकास अधिकारी ए.के.जाधव, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी खेरे, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता काळोखे, शांताराम कदम, प्रशांत ढोरे, माजी सदस्य बाळासाहेब काळोखे, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, हेमा मोरे, सुनिता टिळेकर, उपसरपंच संतोष हगवणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ महाराज मोरे व सर्व विश्वस्थ आदी उपस्थित होते. दुपारी साडेबारा वाजल्यानंतर पालखी वैंकुठगमन मंदिरामधून पुन्हा देऊळवाड्यात आल्यानंतर देऊळवाड्यात पालखी विसावली.