ताथवडेमध्ये लिफ्टच्या डक्टमधून खाली पडल्याने तरूणाचा मृत्यू

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
ताथवडे येथील मोमाई कन्स्ट्रक्शनचे बांधकाम सुरू आहे. त्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्टमधून एक 25 वर्षीय तरुण खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रजेन बुधीराम बोरो (वय 25) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मोमाई कन्स्ट्रक्शनचा मालक दिपेश उकाने याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ताथवडे येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
30 जानेवारीला सायंकाळी चारच्या सुमारास बोरो हे येथे काम करीत असताना या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्टमधून ते खाली पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिपेश उकाने याने कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा करीत लिफ्टच्या डक्टमध्ये सुरक्षा जाळी लावली नाही, तसेच ते बंद करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बोरो यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी उकाने याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.





