ठेकेदाराकडून थेट बँक खात्यात लाच ! डॉ.अनिल रॉय, सुनील बेळगावकर, सुनील लोंढे यांना आयुक्तांचा दणका
पिंपरी: ठेकेदाराकडून थेट बँक खात्यावर पैसे घेणारे पिंपरी-चिंचवड पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर आणि बायोमेडिकल इंजिनिअर सुनील लोंढे यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलाच दणका दिलेला आहे. तिघांच्या या कृतीमुळे पालिकेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत खातेनिहाय चौकशीचे आदेश दिलेले आहेत.
रॉय यांचे आर्थिक अधिकार काढलेले आहेत. रॉय यांनी मुलाच्या व्यवसायाबाबत आणि बेळगावकर यांनी पत्नीच्या व्यवस्याबाबत पालिकेला कळविणे आवश्यक असतानाही हेतुपुरस्सर कळविलेले नाही. त्यामुळे रॉय यांच्या मुलाचा आणि बेळगावकर यांच्या पत्नीचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे.
नगरसेवक तुषार कामठे यांनी हे प्रकरण बाहेर काढलेले होते. श्री कन्स्ट्रक्शन यांच्या जमा खर्चच्या छायांकित प्रतीमध्ये सन 2017-18 टॅक्स ऑडिट रिपोर्टमधील प्रतीमध्ये मालमत्ता म्हणून लोन ऍडव्हान्स या शीर्षाखाली डॉ. रॉय यांचे नावे दोन लाख, बेळगावकर 80 हजार आणि लोंढे यांच्या नावावर दोन लाख 43 हजार 208 रुपये घेतल्याची नोंद आढळून आलेली आहे.