ट्रक चालकाने पोलिसांचा जॅमर पळविला ; चिंचवडमधील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/11police.jpg)
पिंपरी – नो पार्किंग परिसरात ट्रक उभा केल्याच्या कारणावरून वाहतूक विभागाच्या अधिका-यांनी ट्रकला जॅमर लावला. सरकारी जॅमर तोडून ट्रक चालकाने ट्रक पळवून नेला. तसेच तोडलेला जॅमर देखील चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 12) रोजी बिजलीनगर येथे घडला.
चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस नाईक सतीश मगर यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार परमेश्वर गोविंद केंद्रे (वय 48, रा. मु. पो. शिवली, ता. जि. जालना या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील बिजलीनगर चौकात ठराविक ठिकाणी नो पार्किंग करण्यात आले आहे. 12 जून रोजी केंद्रे याने या चौकात नो पार्किंगमध्ये आपला ट्रक लावला. त्यामुळे वाहतूक विभागाच्या अधिका-यांनी ट्रकवर कारवाई करत ट्रकच्या चाकाला जॅमर लावला. ट्रक चालकाने पोलिसांच्या नकळत कशाच्या तरी साहाय्याने ट्रकच्या चाकाला लावलेला जॅमर (किंमत 1 हजार 200 रुपये) तोडला. तोडलेल्या जॅमरसह ट्रक घेऊन पळून गेला. त्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान करून ती चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सपना देवतळे तपास करीत आहेत.