जनतेसाठी तळमळीने झटणारा झुंजार कार्यकर्ता व उत्तम सहकारी गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोना या विषाणुचा संसर्ग झाल्याने निधन झाले. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाऊक शब्दांत श्रध्दांजली वाहिली आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारा झुंजार कार्यकर्ता, उत्तम सहकारी गमावल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून दत्ता साने यांनी शहरातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. पक्ष संघटनेची ध्येयधोरणे राबविणा-या या झुंजार कार्यकर्त्याची व सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहातील त्यांचे कामकाज आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांप्रती असलेले त्यांचे कार्य पक्षातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.





