चीनचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Screenshot_20200625_161537.jpg)
पिंपरी : चीनने भारताच्या 20 जवानांना छळ करुन मारले आहे. त्यामुळे चीनविरोधात संतापाची भावना आहे. याचे पडसाद देशभर उमटले. चीनच्या निषेधार्थ आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांवर पिंपरीत गुन्हे दाखल झाले आहेत. हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. यामुळे भारतीय नागरिकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यासाठी दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
खासदार बारणे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. तसेच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याशी संपर्क साधून तात्काळ गुन्हे मागे घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
खासदार बारणे म्हणाले, चीनने भारताच्या सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रतिकार करणा-या भारताच्या शूर जवानांचा चीनने अमानूषपणे छळ केला. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यामुळे चीनविरोधात भारतात संतप्त लाट उसळली आहे. ठिक-ठिकाणी चीनविरोधात आंदोलन करत नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत.
पिंपरीतही काही कार्यकर्त्यांनी 22 जून रोजी चीनचा निषेध केला. शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहिली. परंतु, पोलिसांनी निषेध करणा-यांविरोधात पिंपरी ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. परकीय देश भारताविरोधात कृत्य करतो. जवानांचे बळी घेतो. जवान देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतात. या शूर जवानांचा बळी गेल्यानंतर चीनचा निषेध करणा-या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे अतिशय चुकीचे आहे.
गुन्हे दाखल केल्याने भारतीय नागरिकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. नागरिकांमधील चीड शमविण्याचे काम होते. चीन सारख्या अशा देशाचा हजारवेळा निषेध केला पाहिजे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. त्यावर तात्काळ माहिती घेऊन गुन्हे मागे घ्यायला लावतो, असे आश्वासन आयुक्त बिष्णोई यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.