चिखली पोलिसांचे कारवाईचे धाडसत्र; गुन्हेगारांना झाली ‘पळता भुई थोडी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Untitled-1-copy-140.jpg)
- वेगवेगळ्या ठिकाणांवरून नऊजणांना घेतले ताब्यात
- तब्बल 4 लाख 83 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चिखली पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करून अल्पवयीन मुलांसह नऊजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून घरफोडी, चोरी अशा गुन्ह्यांतील 4 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अशोक बबन बहिरट (रा. रुपीनगर, चिखली), सुनील रमेश इब्राहिमपुरकर (वय 19, रा. सिंहगड कॉलनी, अंगणवाडी रोड, मोरेवस्ती, चिखली) या दोघांना अटक केली आहे. यांच्यासह सात अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. पहिल्या कारवाईमध्ये जाधववाडी चिखली येथील लाकडाच्या वखारीमागे दोन संशयित गुन्हेगार थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सतर्कता दाखवित दोघांनाही एका दुचाकीसहर (एम एच 14 / बी क्यू 5473) ताब्यात घेतले. चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे पल्सर (एम एच 16 / ए यु 5759) आणि स्प्लेंडर प्लस (एम एच 14 / बी एच 9949) अशा दोन दुचाकी आणि एक मोबाईल फोन चोरल्याचेही समोर आले. त्यांच्याकडून तीन मोटारसायकल आणि एक मोबाईल असा 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दुस-या कारवाईत आरोपी अशोक बहिरट याला चिखली मधून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने एक घरफोडी केल्याचे सांगितले. त्याच्याकडे 1 लाख 74 हजार रुपयांचे दागिने मिळाले. तिस-या कारवाईमध्ये फुलेनगर येथील मिनी मार्केटमधून दोन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांनी एक सॅमसंग गॅलक्सी एस 6 मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला. चौथ्या कारवाईमध्ये मोरेवस्ती येथे तीन अल्पवयीन मुले पल्सर कंपनीची दुचाकी घेऊन संशयितरित्या थांबले होते. त्यामुळे त्यांच्याकडे चौकशी करत त्यांची अंगझडती घेतली. 2 लाख 16 हजार रुपये किमतीचे दहा मोबाईल फोन त्यांच्याजवळ मिळून आले. पाचव्या कारवाईमध्ये मोरेवस्ती मधून आरोपी सुनील इब्राहिमपुरकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन हजार रुपयांचा एक मोबाईल फोन जप्त केला.
सर्व कारवायांमध्ये चिखली पोलिसांनी चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीच्या सात गुन्ह्यातील मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा एकूण 4 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मसाजी काळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बागुल, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, सुरेश जाधव, राम साबळे, बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, अमोल साकोरे, विपुल होले, नरहरी नाणेकर, सचिन गायकवाड, कबीर जारी, सापळाक यांच्या पथकाने केली.