चिखली गावातील इंद्रायणी नदीमधील जलपर्णी काढा – दिनेश यादव
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना दिले निवेदन
पिंपरी | प्रतिनिधी
चिखली गावातील इंद्रायणी नदीमध्ये जलपर्णी वाढली आहे. ही जलपर्णी त्वरित काढण्याची मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली.
या वेळी रामकृष्ण लांडगे, अनिकेत शेलार, दीपक घन, प्रकाश चौधरी, जवाहर ढोरे उपस्थित होते.
दिनेश यादव यांनी निवेदनात नमूद केले आहे की, गावातील नदीवर मोठ्या प्रमाणात जलपर्णी आलेल्या आहेत. अशुद्ध पाणी नदीत मिसळल्यामुळे हे जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वारंवार पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांना सांगून देखील जलपर्णी काढण्यात आलेली नाही. त्यामुळे महापौर माई ढोरे यांना भेटून लेखी पत्र दिले. सर्व जलपर्णी काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. जलपर्णी वाढल्यामुळे अनेक ठिकाणी डासोपत्ती होत आहे. कीटकनाशक वाढल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. जलपर्णी काढल्यावर नदीचे पाणी स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. तसेच डास मोठ्या प्रमाणात कमी होतील.
या वेळी महापौर माई ढोरे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना बोलावून त्वरित जलपर्णी काढण्याच्या सुचना दिल्या.