चिखलीत एकाच्या खुनाचा प्रयत्न, पतीपत्नीवर गुन्हा दाखल

पिंपरी, (महाईन्यूज) – डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने मारहाण करत एकाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात पतीपत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 10) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिखली येथे घडली आहे.
पोपट आरणे आणि रेखा आरणे (रा. मोरया हौसिंग सोसायटी, घरकूल चिखली) या पतीपत्नींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण नारायण दुसाणे (वय 47, रा. मोरया हौसिंग सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण दुसाणे यांच्या पत्नी आणि रेखा आरणे यांच्यात सोमवारी सकाळी कचरा टाकण्यावरून किरकोळ भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून रेखा यांचे पती पोपट यांनी त्यांच्या घरासमोर लावलेला दुसाणे यांचा रिक्षा बाजुला काढून लावला. दुसाणे यांनी याची विचारणा केली असता पोपट यांनी शिवीगाळ केली. लाथाबुक्यांनी मारहाण करून डोळ्यात मिरचीपूड टाकून लोखंडी रॉडने डोक्यात, तोंडावर, हातावर, पाठीवर गंभीर स्वरुपाची मारहाण केली आहे. माझा खून करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दुसाणे यांनी पोलिसांत केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.





