चिखलीतील अनाधिकृत घरांवरील कारवाईस तुर्तास ब्रेक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/b10df21b-2fa0-4bb2-9ef4-05828c86daae.jpg)
- आमदार महेश लांडगे यांची यशस्वी शिष्टाई
- चिखलीतील युवा नेते पांडा सानेंचा पुढाकार
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने चिखली, मोरेवस्ती भागात अतिक्रमण कारवाई हाती घेतली आहे. नागरिकांनी पै-पै जमा करून उभ्या केलेल्या घरांवर बुलडोझर फिरविण्यासाठी शेकडो घरमालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, भाजपाचे युवा नेते पांडा साने यांच्या पुढाकारानंतर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी यशस्वी शिष्टाई केल्यामुळे नागरिकांच्या घरांवर होणारी कारवाई तुर्तास टळली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने चिखलीतील मोरे वस्ती, सोनवणे वस्ती परिसरात राहणा-या नागरिकांना कारवाईसंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत. नागरिकांनी शहरात मोलमजुरी करून उभे केलेले हक्काचे घर पाडण्याचा इशारा प्रशासनाने नोटीसीतून दिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. आपली घरे वाचविण्यासाठी नागरिकांनी भाजपाचे युवा नेते पांडा साने यांच्याकडे कैफियत मांडली. त्यावर साने यांनी तातडीने आमदार महेश लांडगे यांच्याशी संपर्क साधून हा विषय कानावर घातला. त्यानंतर आमदार लांडगे यांनी मोरेवस्ती, सोनवणेवस्ती परिसराला भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा केली. यातून मार्ग काढण्यासाठी पालिका अधिका-यांची बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या घरावरील कारवाई काही काळासाठी स्थगित केली आहे.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असल्यामुळे याठिकाणी राज्याच्या कानाकोप-यातून नागरिक कामानिमित्त शहरात स्थायीक झाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आहोरात्र कष्ट करून त्यांनी मिळालेल्या पैशातून राहण्यासाठी हक्काचा निवारा तयार केला. त्यासाठी कोणी गावाकडील शेती विकली, कोणी दागदागिणे गहाण ठेवले, तर कोणी बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे. अशा मार्गाने उभे केलेले घर पाडण्याची प्रशासनाकडून धमकी दिली जात असल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भिती तयार झाली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी पांडा धावून आल्यामुळे त्यांना लाख मोलाचा आधार मिळाला आहे.