चिंचवडमध्ये नवरात्र महोत्सव आयोजित ‘भजन स्पर्धा’ उत्साहात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/DSC_3223.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नवरात्र महोत्सवात साडेतीन शक्तीपीठे, अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. या नवरात्र महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या भजन स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील तब्बल ४६ भजनी मंडळे सहभागी झाली होती. या स्पर्धेसाठी प्रत्येक सहभागी भजनी मंडळाला १० मिनिटाची वेळ देण्यात आली होती. त्यामध्ये एक संतरचित अभंग व एक गौळण सादर करणे असा स्पर्धेचा नियम होता. सर्व भजनी मंडळांनी विविध अभंग तसेच गौळणी सादर केल्या. सुमधुर गायन आणि त्याला टाळ, पेटी, तबला यांची सुरेख साथ मिळाली व रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले.
या स्पर्धेसाठी केशव नेर्लेकर, सदाशिव गर्जे, अविनाश लेले, मधुकर मोरे, परकाळे गुरुजी, सुखदेव महाराज बुचडे आणि मीरा काटमारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यामध्ये जय गणेश भजनी मंडळ, संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ आणि हरी ओम महिला भजनी मंडळ या तीन मंडळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.
भजन स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि युवासेना प्रसारक वैभवजी थोरात, मावळ युवसेना अध्यक्ष अनिकेत घुले, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे दिलीप कुलकर्णी आणि सदस्य, शिवाजी उदय मित्रमंडळाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या संयोजनामध्ये ज्ञानदेव बोरुडे, बाळासाहेब वाल्हेकर, दत्तात्रय भोंडवे, संजय कलाटे, माणिक म्हेत्रे, ह.भ.प.उद्धव महाराज कोळपकर, किसन महाराज चौधरी यांनी विशेष सहाय्य केले.