शहराची “तहान’ टॅंकरवर ; महापालिकेचे पाणी हद्दीबाहेर?

– महापालिकेच्या पाण्याची होतेय विक्री
– खासगी टॅंकर सप्लायर्सने मांडलाय धंदा
विकास शिंदे
पिंपरी ( महा ई न्यूज ) – एेन सणासुदीत सत्ताधारी भाजप काळात शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम पाणी टंचाई सुरु आहे. अनेकदा अस्वच्छ, घाण, तांत्रिक कारणाने पाणी पुरवठा विस्कळीत केला जातो. त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक खासगी टॅंकरने पाणी पुरवठा करत आहे. मात्र, परतीच्या पावसाळ्यात चिंचवडसह भोसरी विधानसभा मतदार संघातील भागात नागरिकांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. शहरातील 15 खासगी टॅंकर सप्लायर्स दररोज 70 ते 80 पिण्याच्या पाण्याच्या खेपा मारतात. हे टॅंकर महापालिका हद्दीबाहेर जावून पाणी पुरवठा करतात. त्यामुळे खासगी टॅंकर सप्लायर्स महापालिकेच्या पाण्याची विक्री करत आहेत का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 98 टक्के पाणी साठा आहे. त्यातून मावळातील गावांनाही पाणी पुरवठा केला जातो. यामुळे उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन होवून पाणी पुरवणे गरजेचे आहे. आता शहरातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई होवू लागली आहे. महापालिका हद्दीच्या सामाविष्ट गावांतील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच चिंचवड विधानसभेतील काही भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुरळीत होत असल्याच्या वल्गना केल्या, तरी अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय, तर काही ठिकाणी पाणी पुरवठा न झाल्याने टॅंकरने पाणी देण्याची वेळ आली. महापालिका माणसी 135 लीटर पाण्याऐवजी 150 लीटर पाणी देते. तरीही चिंचवड, वाकड, निगडी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, थेरगांव, पुनावळे, भोसरी, चिखली, थेरगांवसह अनेक भागांत सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. अनेक भागात नागरिकांना पिण्याचे पाणी खासगी टॅंकरने पुरवले जात आहे.
पाणी पुरवठादार अधिकाऱ्यांच्या संगनमताने पाण्याची विक्री करू लागलेत. तसेच, काही टॅंकर महापालिका हद्दीबाहेरही जावू लागलेत. याबाबत पाणी पुरवठा अधिकारी झोपेचे सोंग घेवून अनभिज्ञ असल्याचे दाखवू लागले आहेत. पवना धरणात मुबलक पाणी असताना केवळ पाण्याचे योग्य व काटेकोर नियोजन नसल्याने शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामूळे अधिकारी व खासगी टॅंकर सप्लायर्स नागरिकांच्या पाणी टंचाईचा फायदा घेवून व्यवसाय थाटू लागल्याचे दिसत आहे.
——————————
शहरात टॅंकर सप्लायर्सचा धंदा !
महापालिका संकेत स्थळावर पाणी पुरवठा विभागाने खासगी टॅंकर सप्लायर्सची यादी दिली आहे. नागरिकांकडून मिळेल तेवढी रक्कम खासगी टॅंकर सप्लायर्स वसूल करीत आहेत. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून खासगी टॅंकर सप्लायर्स दापोडी, सांगवी, किवळे, बोपखेल, भोसरी, चऱ्होली, चिखली, मुळशी, थेरगांव यासह अनेक भागांत पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरने नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहेत. साधारणतः एक टॅंकर दिवसात 7 ते 8 खेपा करतात. एका टॅंकरला 1 हजार रुपये नागरिकांकडून घेण्यास महापालिकेने सांगितले आहे. परंतु, लांबचा पल्ला, डिझेलचे वाढलेले दर या कारणांनी एका टॅंकरला सुमारे 1200 ते 1500 रुपये घेतले जातात. तसेच, महापालिका पाणी पुरवठा अधिकारीच आम्हाला पाणी पुरवठा करण्यास सांगतात. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही शहरातील अनेक भागांत टॅंकरने पाणी पुरवत आहे. ज्या ठिकाणी पालिकेच्या पाणी पुरवठा टाक्या आहेत, तेथूनच पाणी घेवून आम्ही नागरिकांना विकत पाणी देत आहे, असे एका खासगी टॅंकर सप्लायरने सांगितले.





