चाकण एमआयडीसीत खळबळ; एकाच कंपनीतील शंभरहून अधिक कामगार करोना ‘पाॅझिटिव्ह’
पिंपरी |महाईन्यूज|
पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी पट्ट्यात देखील करोनाचा संसर्ग होवू लागला आहे. पुणे – नाशिक महामार्गावरील चाकण एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत शंभरहून अधिक कामगार करोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे औद्योगिक पट्ट्यात एकच खळबळ उडाली आहे.
चाकण एमआयडीसीत छोटे-मोठे उद्योग सुरु आहेत. त्या परिसरात अनेक कामगार उदरनिर्वाहासाठी परराज्यातून आलेले आहेत. त्यातील काही कामगार पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे एमआयडीसीत एकाच कंपनीत शंभरहून अधिक रुग्ण सापडल्याने वैद्यकीय प्रशासन हादरले आहे.
एमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. ऑटोमोटिव्ह सीटिंग आणि ई-सिस्टम्स बनवणाऱ्या नामांकित कंपनीत ही धक्कादायक बाब समोर आली. नुकतंच एका कर्मचाऱ्याचा कोविड अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कंपनीने 800 कामगारांच्या खाजगी प्रयोगशाळेत चाचण्या केल्या. त्यापैकी आणखी अहवाल प्रतीक्षेत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातीलच एका खाजगी प्रयोगशाळेने ही प्रक्रिया पार पाडली. 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान या प्रयोगशाळेने इतक्या मोठ्या प्रमाणात कामगारांचे स्वॅब घेतले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत या कामगारांचे अहवाल हाती येऊ लागले. बघता-बघता 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. पैकी अनेक अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती खेड तालुका प्रशासनाने दिली. 110 मधील 51 कोरोना बाधित हे खेड तालुक्यातील आहेत, तर उर्वरित हे पिंपरी चिंचवड, पुणे आणि ग्रामीण भागातील आहेत.





