चर्होली, मोशी, डुडुळगावातील रस्ते विकासाच्या जागांचे भूसंपादन तातडीने करा – आ. महेश लांडगे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/IMG-20181009-WA0012.jpg)
महानगरपालिका नगररचना व भुसंपादन विभागाची घेतली बैठक
पिंपरी, (महा ई न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये रस्त्यांचे जाळे उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांच्या जागांचे भूसंपादन करण्याची गरज आहे. मोशी, दिघी, च-होली, डुडुळगाव येथील रस्त्याच्या निविदा निघाल्या आहेत. त्यामुळे जागांचे त्वरित भूसंपादन करण्यात यावे, असे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत.
भोसरी मतदार संघातील भुसंपादनाबाबत आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी (दि.8)नगररचना व भुसंपादन विभागाची आयुक्त दालनात आढावा बैठक घेतली. यावेळी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश आमदार लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकुर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे भुसंपादन अधिकारी सांकला साहेब, देव साहेब, पिंपरी-चिंचवड भुमी अभिलेख उपअधीक्षक शिवाजी भोसले, हवेलीच्या उपअधीक्षक गौंड मॅडम यांच्यासह नगररचना विभागाचे व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये प्रशस्त रस्ते झाले पाहिजेत. त्यासाठी आरक्षणाच्या जागा ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नगररचना विभागाने पाऊले टाकणे अपेक्षित आहे. मोशी, दिघी, च-होली, डुडुळगावातील रस्त्याच्या निविदा निघाल्या आहेत. परंतु, भूसंपादन झाले नाही. त्यासाठी तत्काळ भुसंपादन करण्यात यावे. तसेच यावेळी मंजुर प्रकरणाचा आढावा घेण्यात आला’.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘प्रलंबित जागांचा भूसंपादनाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. भुमीअभिलेख हवेली आणि महापालिकेच्या नगररचना विभागास तत्काळ मोजणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले’.