घरोघर तपासणीसाठी पथके; परदेशातून आलेल्यांना घरीच थांबण्याचा सल्ला
![महिला डॉक्टरने ‘कॅन्सर’ झाल्याचे सांगत रुग्णाला घातला दिड कोटीचा ‘गंडा’](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/doctors-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत घरोघर तपासणीसाठी शंभर पथके तयार करण्यात आली आहेत. सुमारे सात हजारहून अधिक घरांची, तर २१ हजार ५८३ नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. दोन्ही महापालिका मिळून २६ हजार ३१५ घरे आणि एक लाख १७ हजार ३८६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात दहा नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.
पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले सात, तर पिंपरी-चिंचवड शहरात दहा रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना घरीच विलगीकरण कक्षात राहण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. पण, त्यापैकी अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत.
काहींचे थेट फोटोच प्रशासनाला उपलब्ध झाले आहेत. अशा नागरिकांनी आपल्या कुटुंबाबरोबरच समाजातील अन्य लोकांना त्याची लागण होणार नाही, याचे भान ठेवण्याची गरज आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव समाजात होऊ नये, यासाठी त्यांना या सूचना दिल्या आहेत. परंतु नियमांचे उल्लंघन करणे, हे योग्य नाही, असे डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सांगितले.