breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गोकुळ अष्टमी : भावी आमदारांचा विधानसभेच्या लोण्यावर डोळा

  • सेलिब्रिटींवर कोट्यवधींची उधळपट्टी
  • चौकाचौकांत बेकायदेशीर फ्लेक्सची गर्दी

पिंपरी – दहीहंडीचा मुहूर्त साधून शहरातल्या भावी आमदारांनी मतदारांना खूष करण्यासाठी आपापल्या विधानसभा कार्यक्षेत्रात भव्यदिव्य दहीहंडी महोत्सव घेतला आहे. मतदारांना मोहीत करण्यासाठी बॉलिवूड तसेच मराठी सिनेमा, सिरियलमधील आपल्या अदाकारी कलाविष्काराने लक्ष्यवेधक ठरलेल्या सिनेतारकांना पाचारण केले आहे. त्यासाठी सेलिब्रिटींवर लाखो रुपयांची बरसात केली आहे. गोकुळ अष्टमीचा मुहूर्त साधून आमदारकीच्या हांडीतील लोणी चाखण्यासाठी या धनदांडग्यांनी बाजी पनाला लावली आहे.

 

पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून तसेच देशभरातून याठिकाणी स्थायीक झालेला मजूर वर्ग रक्ताचे पाणी करत आहे. त्याच्या परिश्रमातून नावारुपाली आलेल्या उद्योगनरीत पिंपरी-चिंचवड महापालिका सुविधा पुरविते. मात्र, विकासाच्या नावाखाली सत्ताधा-यांकडून कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटला जातो. एकीकडे घाम गाळणारा वर्ग आहोरात्र कष्ट करतो तर, दुसरीकडे त्यांचे मतात रुपांतर करण्यासाठी राजकीय धनदांडग्यांकडून लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. त्याकरिता राजकीय ब्रॅंडींग करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करणा-या इच्छुकांनी लाखो रुपये खर्च करून दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा सण साजरा करण्यासाठी तरुणांमध्ये उत्साह असला तरी कोट्यवधी रुपये पाण्यात जात असल्याकडे कोणी लक्ष देत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

 

शहरातील विधानसभा निवडणुकीची तयारी करणा-या भावी आमदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मतदारांना खूष करण्यासाठी दहिहंडीचा मुहूर्त साधून बॉलिवूडमधील सिनेतारकांना निमंत्रीत केले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिंदी, मराठी सिनेमातील व मालिकेतील नावारुपाला आलेल्या अभिनेत्रींना व्यासपीठावर उपस्थित राहून आपल्या अदाकारी कलेचा अविष्कार सादर करण्यासाठी लाखो रुपयांची सुपारी दिली आहे. भोसरीत अमोल देशमुख, मोरया फेम स्पृहा जोशी, निगडी प्राधिकरणात स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, कांचन कासवी, स्नेहलता तावडे, पिंपरीत दबंग फेम संदीपा धर, अंजना सुखानी, सारा खार, सायली पाटील, अशा असंख्य सिनेतारखा पिंपरीत दाखल झाल्या आहेत. दहिहंडीच्या या भव्यदिव्य सोहळ्याच्या माध्यमातून मतदारांवर मोहर टाकण्यासाठी या स्वयंघोषीत भावी आमदारांनी हा खटाटोप केला आहे.

 

कायदा हा सर्वसामान्यांना दडपण्यासाठीच

दहिहंडी सोहळा आयोजनाच्या नावाखाली लोकप्रतिनिधींनी तसेच राजकीय पार्श्वभूमीच्या व्यक्तींनी महापालिकेचे नियम धाब्यावर बसविले आहेत. सीनेतारकांसह स्वतःचे फोटे असलेले फ्लेक्स शहरातील चौकांचौकांत लावून विद्रुपीकरण केले आहे. याकडे पाहून एरवी हातगाडी, पथारी, टपरी वाल्यांवर कारवाई करणारे महापालिका प्रशासन निद्रावस्थेत आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. याकडे आयुक्त श्रावण हार्डीकर यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. चौकाचौकांत बेकायदेशीर विनापरवाना फ्लेक्स लावून प्रशासकीय नियम पायदळी तुडविणा-या राजकीय व्यक्तींवर कारवाई करण्यापासून पळ काढला आहे. आयुक्तांच्या या दुटप्पी भूमिकेवरून कायदा हा धनदांडग्यांसाठी नसून सर्वसामान्य नागरिकांना दडपण्यासाठी उपयोगात आणला जात असल्याचे सिध्द झाले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button