गृहमंत्र्यांनी केले पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांचे कौतुक
![Cyber attacks start in the state, read the appeal made by the Home Minister regarding vaccination](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Anil-Deshmukh.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
दृष्टिहीन बांधवांना आपल्याला जी मदत करणे शक्य आहे, ती केली पाहिजे. आपण केलेली मदत कौतुकास्पद आहे. पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या या कृतीचा मला अभिमान आहे, असे ट्विट करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दृष्टीहीन बांधवांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
जागतिक अंध दिनानिमित्त प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड व ‘जितो’ पिंपरी-चिंचवड या संस्थांनी ‘चलो किसिका सहारा बने’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात केले होते. आयुक्तांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून व हातात काठी घेऊन व्यासपीठावर आगमन केले. याची चाहूल लागताच अंध विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पांढऱ्या काठीचे व मिठाईचे वाटप केले.
आयुष्यात असणाऱ्या अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या अंध व्यक्तींनी खचून न जाता नवी व मोठी स्वप्नं पाहून यशाची शिखरे गाठावीत, असा सल्लाही दिला. त्यांना मदतीचा हात देऊन आत्मनिर्भर होण्याचा मंत्रही दिला. या कार्यक्रमाची क्षणचित्रे आयुक्तालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द झाली. याची दखल घेत गृहमंत्र्यांनी ट्विटरद्वारे कौतुकाची थाप दिली. समाजातील वंचित घटकासाठी केलेली ही मदत पोलिस खात्याची प्रतिमा वाढविणारी असल्याचे सांगत त्यांनी याबाबत आयुक्तांचे कौतुक केले.