गाईच्या वासराला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
जन्म घेऊन पंधरा दिवस झालेल्या वासराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 20 ते 22 जुलै दरम्यान सांगवी येथील वाळुंज यांच्या गाईच्या गोठ्यात घडली.
बाळासाहेब बाजीराव वाळुंज (वय 61, रा. ढोरे पाटील फार्म, नवी सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी स्वप्निल पुष्कराज जोशी (वय 25, रा. राज प्लाझा, शिवाजी पार्क, साई चौक, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी येथील ढोरे पाटील मार्फ याठिकाणी वाळुंज यांचा गाईचा गोठा आहे. याठिकाणी एका वासराला जन्म घेऊन अवघे पंधरा दिवस झाले आहेत. त्याला बाळासाहेब वाळुंज यांनी बेदम मारहाण केली. दोरीने व हाताने अमाणुष मारहाण केली. हा प्रकार निदर्शनास येताच स्वप्निल जोशी यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली आहे.
बाळासाहेब वाळुंज यांच्यावर प्राण्यांना निर्दयतेने वागण्याचा अधिनियम संबंधितचा कायदा 1960 चे कलम 11 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.