कोरोना स्थितीचा केंद्रीय पथकाने पिंपरी चिंचवडमध्ये घेतला आढावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/009-scaled.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कोरोनाची लक्षणे आढळल्यास या आजाराचा उपचार घेण्यासाठी नागरिकांनी प्राधान्याने कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पथकाचे प्रमुख व नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेसचे (एम्स) अतिरिक्त प्राध्यापक डॉ. अरविंदसिंग कुशवाहा यांनी केले.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाने पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड अंतर्गत उभारलेल्या विविध कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा देखील पथकाने घेतला. डॉ. कुशवाहा यांच्या समवेत नागपूरच्या एम्सचे डॉ. एस. बॅनर्जी होते. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरातील कोविड संदर्भातील उपाययोजना आणि सद्यःस्थितीबद्दल माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उप आयुक्त अजय चारठणकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे डॉ. सुनील पवार, डॉ. परमानंद चव्हाण आदी उपस्थित होते.
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरला पथकाने भेट देऊन तेथील यंत्रणेची माहिती घेतली. डॉ. संदेश कपाले यांनी सेंटरच्या कामकाजाची माहिती दिली. या सेंटरचे काम व्यवस्थित चालू असल्याबद्दल डॉ. कुशवाहा यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना आजाराने बाधित झालेल्या रुग्णांवर याठिकाणी उपचार केल्यानंतर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना डॉ. कुशवाहा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सदृढ आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पथकाने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास भेट देवून तेथील यंत्रणेची पाहणी केली.
शहरातील कोविड अंतर्गत केलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल डॉ. कुशवाहा यांनी महापालिकेचे कौतुक केले. महापालिका ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम चांगल्या पद्धतीने राबवत आहे. सर्व्हेक्षणातून प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक सक्षमतेने उपाययोजना राबवणे शक्य होणार आहे. भविष्यातील कोरोनाच्या आजाराचा प्रसार विचारात घेता त्यानुसार व्यवस्थापनाचे नियोजन वेळेत करणे आवश्यक असल्याचे डॉ. कुशवाहा यांनी सांगितले.