कोरोना बाधित तिघे ठणठणीत बरे; डॉक्टर, स्टाफ नर्स, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून रुग्णांना निरोप
![Head of Medical Department of YCM, the authority to purchase medicine up to Rs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/ycm-photo.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुणे शहरातील करोनाबाधित दाम्पत्य करोनामुक्त झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. १२ मार्च रोजी कोरोना झालेले ३ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे तिन्ही रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांचे दुसऱ्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना आज वायसीएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ नर्स, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून या रुग्णांना निरोप दिला. तर रुग्णांनी सर्व डॉक्टर, स्टाफ नर्स कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
पुणे येथे सापडलेल्या दोन रुग्णांसोबत दुबई येथून आलेल्या शहरातील तीन जणांना करोनाची लागण झाली होती. त्यांना १२ मार्च रोजी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चौदा दिवस त्यांच्यावर उपचार केल्यानंतर गुरुवारी त्यांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर आज त्यांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्याने ते करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान त्यांना वायसीएम रुग्णालयातून आज डिस्चार्ज दिल्या नंतर त्यांना पुढील चौदा दिवस घरातच थांबवे लागणार आहे. आठ दिवसापूर्वी शहरामध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या होती. मात्र महापालिकेच्या योग्य नियोजनामुळे सहा दिवसांत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यात पहिल्या तीन रुग्णांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे . या तीनही रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे.