कोरोना निर्बंधाचे उल्लंघन करणा-या 45 हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई
- सुमारे 2 कोटी 8 लाख 30 हजार रुपये दंड वसूल
पिंपरी महाईन्यूज
कोरोना प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत महापालिका प्रशासनाने निर्गमित केलेल्या विविध सूचना आणि आदेशांचे उल्लंघन करणा-या ४५ हजार १४३ व्यक्तींवर महापालिकेने कारवाई केली असून आजअखेर पर्यंत सुमारे २ कोटी ८ लाख ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येकाने कोरोना विषयक नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.
महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत विविध प्रकारचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मास्कचा वापर करावा, अनावश्यक गर्दी करु नये, नियमानुसार परवानगी घेऊन व्यक्ती संख्येच्या मर्यादा पाळून कार्यक्रमाचे आयोजन करावे, आदी सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीदेखील शहरात लागू करण्यात आली आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या विविध सूचना आणि आदेशांचे पालन करावे असे नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात आले. तरी देखील काही नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पथकामध्ये महापालिका, पोलीस प्रशासन आणि शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे मंगल कार्यालये, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे, विविध कार्यालये, हॉटेल्स्, महत्वाच्या बाजारपेठा, चौक, आस्थापना, भाजी मंडई अशा विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्यात येत आहे. विनामास्क आढळणा-या तसेच व्यक्ती व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतराचे पालन न करणा-या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.
विनामास्क आढळलेल्या व्यक्तींची संख्या ३९ हजार ८२७ असून त्यांच्याकडून १ कोटी ९९ लाख १३ हजार ५१४ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलेल्या ५ हजार २८६ व्यक्तींकडून ८ लाख ४१ हजार ४०० रुपये तर फिजीकल डिस्टंसिंगचे उल्लंघन करणा-यांकडून ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द कारवाई सुरु राहणार असून नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.