कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकविरा देवीची यात्रा रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/11-6.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिध्द देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासकिय समितीने घेतला आहे. चैत्री यात्राकाळातील देवीचे सर्व धार्मिक विधी व पुजापाठ हे परंपरेनुसार केले जाणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोना संसर्ग रुग्ण आढळले आहेत. सदर विषाणूंचा संसर्ग ठाळण्याकरिता व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून जाहिर यात्रा न भरविण्याचा निर्णय श्री एकविरा देवस्थान कार्ला येथिल प्रशासकिय समितीने घेतला आहे.
वडगाव मावळ येथे प्रशासकिय समितीचे अध्यक्ष व वडगाव मावळ येथिल दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश, सचिव व मावळचे तहसिलदार व सदस्य सह धर्मदाय आयुक्त यांनी भाविक व वेहेरगाव ग्रामस्त यांच्याशी बैठक घेत हा निर्णय जाहिर केला. तदपुर्वी वेहेरगाव ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा न भरविण्याचा ठराव पारित केला होता.
देशासह महाराष्ट्रात सर्वत्र कोरोना वायरसमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत सर्व सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी असे आदेश दिले आहेत. एकविरा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील वेहेरगाव गावात असून येथे चैत्री यात्रेकरिता संपुर्ण महाराष्ट्रासह कोकण, रायगड, ठाणे, मुंबई भागातून लाखो भाविक येत असतात, गर्दीमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचा सर्वांधिक धोका असल्याने भाविकांनी गडावर गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.