‘कोणत्याही एका पदावर पदोन्नती द्या’, संभाजी ऐवले यांची आयुक्तांकडे मागणी
![Khajgi coaching classes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/pcmc-1-6.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवडमधील लाखो पात्र अर्जदारांना महापालिकेच्या योजनांचा करोडो रुपयांचा लाभ मंजूर करणारे नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांची पदोन्नती जाणिपूर्वक अडवून ठेवली आहे. त्यामुळे सहायक आयुक्त (सामुहिक विकास), सहायक आयुक्त (दिव्यांग कक्ष) किंवा मुख्य समाजविकास अधिकारी पदासाठीचे मंजूर ठरावानुसार कोणत्याही एका पदावर पदोन्नती मिळविण्यासाठी ऐवले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे अर्ज केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नागरवस्ती विकास योजना विभागासाठी सहायक आयुक्त (सामुहिक विकास) हे पद 1 डिसेंबर 1989 पासून आजतागायत रिक्त आहे. परंतु, पालिकेतील अधिका-यांनी सहायक आयुक्त पदापुढील सामुहिक विकास हा उल्लेख जाणिवपूर्वक खोडून काढल्याचा आरोप आहे. त्यामुळे शैक्षणिक अर्हता धारण करणारे संभाजी ऐवले यांना या पदावर पदोन्नती मिळू नये, यासाठी हा उद्योग केल्याचा ठपका प्रशासनातील काही अधिका-यांवर ठेवला जात आहे. उलट या पदावर शासनाकडील स्मिता झगडे, प्रविण अष्टीकर, प्रशांत खांडकेकर, सतिष कुलकर्णी, युवराज पोमण, कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली.
महासभेच्या ठराव क्रमांक 913 नुसार अण्णा बोदडे, मनोज लोणकर यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. यापूर्वी ठराव क्रमांक 499 नुसार चंद्रकांत इंदलकर यांना कामगार कल्याण अधिकारी सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. तसेच, महासभा ठराव 4498 नुसार उल्हास जगताप यांना सहायक समाज विकास अधिकारी पदावरून समाज विकास अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच, मुख्य समाज विकास अधिकारी पदासाठी एमएसडब्ल्यू ही शैक्षणिक अर्हता अनिवार्य असून मनपा ठराव 866 नुसार याला मान्यता प्राप्त आहे. ही अर्हता ऐवले धारण करत असताना देखील त्यांना पदोन्नती देण्यात आलेली नाही.
सहायक आयुक्त (सामुहिक विकास), सहायक आयुक्त (दिव्यांग कक्ष) आणि मुख्य समाज विकास अधिकारी या पदांसाठीच्या ठरावाला महासभेने मान्यात दिलेली आहे. तरी, वरीलपैकी कोणत्याही एका पदावर पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी ऐवले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त हर्डीकर यांना मागणी अर्ज केला आहे. पदोन्नती नियम आणि महासभा ठरावानुसार मंजूर पदावर अर्हता धारण करत असताना देखील आयुक्तांकडे पदोन्नतीसाठी व्याकूळ होऊन उघडपणे मागणी करावी लागणारे ऐवले हे पालिकेतील एकमेव अधिकारी आहेत.