केंद्र व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी – सचिन साठे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/PHOTO-2.jpg)
- केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शहर कॉंग्रेसची पिंपरीत निदर्शने
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महागाई कमी करु, शेती मालाला हमी भाव देऊ, पेट्रोल-डिझेल-गॅस कमी किंमतीत देऊ अशी खोटी आश्वासने देऊन 2014 च्या लोकसभा निवडणूकीत सत्तेवर आलेले केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर पुर्णत: अपयशी ठरले आहे, अशी टिका पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी (दि. 7) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी साठे बोलत होते. या निदर्शनात माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, सेवादलाचे राष्ट्रीय पदाधिकारी संग्राम तावडे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल आदी उपस्थित होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.
साठे म्हणाले की, सामान्य नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी या सरकारकडे वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौ-यात तर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ता मिळविण्यासाठी दिल्लीच्या फे-या मारण्यात धन्यता मानत आहेत. मागील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. महागाई, शेतक-यांच्या आत्महत्या व महिलांवरील अत्याचारांचा आलेख वाढतच आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे उद्योजक देशोधडीला लागले असून बेरोजगारी वाढली आहे. केंद्राप्रमाणेच मागील पाच वर्षात राज्यातील सरकारने देखील दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही. निवडणूकीच्या तोंडावर धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण देऊ असे सांगून त्या समाजाची फसवणूक केली आहे.
जनतेच्या मनामध्ये सरकारविरोधात तिव्र असंतोष
केंद्र व राज्य सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात देशभर जनतेमध्ये तीव्र असंतोष आणि संताप आहे. जनतेच्या या तीव्र भावना मांडण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी, कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसने शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पिंपरीत निदर्शने केली.