कासारवाडी दुर्घटनेच्या चाैकशीसाठी पालिकेची त्रिसदस्य समिती नियुक्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/IMG_20190504_175039-300x184.jpg)
- या घटनेला जबाबदार कोण ? पालिकेचे अधिकारी की ठेकेदार याची चाैकशी होणार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – कासारवाडी येथील ड्रेनेजचे काम सुरु असताना एका इमारतीची सिमाभिंत खचली. या भिंतीच्या ढिगा-याखाली सापडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चाैकशीसाठी महापालिका प्रशासन विभागाने त्रिसदस्य समिती नियुक्ती केली असून त्याचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त संतोष पाटील यांनी दिला.
शनिवारी (दि.4) घडलेल्या घटनेत लोकेश सनोज ठाकुर (वय ७) या मुलाचा मृत्यू झाला. कासारवाडीतील गुलिस्ताननगर येथील सर्व्हे क्रमांक ४९७ मधील यशवंत प्राईड सोसायटीच्या इमारतीलगत महापालिकेच्या ड्रेनेजचे काम सुरु होते. यावेळी यशवंत प्राईड इमारतीची सिमाभिंत अचानक खचली. त्या भिंती खाली ड्रेनेजचे काम करणा-या कामगारांसह एक मुलगा या ढिगा-याखाली अडकला. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन कामगारांना बाहेर काढले.
त्यानंतर लोकेशला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, लोकेश सापडत नव्हता. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर ढिगा-याखाली लोकेश सापडला. त्याला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
दरम्यान, या घटनेला जबाबदार कोण? महापालिकेचे अधिकारी की ठेकेदार याची सखोल चाैकशी करण्यासाठी प्रशासन विभागाने त्रिसदस्य समिती नियुक्ती केली. त्यात प्रभागी सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे आणि प्रशासन अधिकारी आशा राऊत यांनी एका महिन्यात सविस्तर चाैकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.