कारगिल विजयदिनी 26 जुलैला ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ युवकांना मोफत दाखविणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/70353512.jpg)
- जिल्हाधिका-यांनी चित्रपटगृह चालकांना दिले आदेश
पुणे – भारतीय सैन्यदलाने उरीमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा एक शो युवकांना मोफत दाखविण्याचे आदेश सरकारने राज्यातील सर्व चित्रपटगृह चालकांना दिले आहेत.
कारगिल विजयदिनी २६ जुलैला सकाळी दहा वाजता राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये १८ ते २५ वयोगटातील युवकांसाठी या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करण्यास सांगण्यात आले असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रपटगृह चालक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांची यासाठी बैठक आयोजित करावी, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केली आहे.
राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्यभावना आणि अभिमान वृद्धींगत व्हावा यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचे म्हणणे आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांनी या सिनेमाद्वारे प्रेरणा घ्यावी, असा उद्देश असल्याचे पत्र निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.