राष्ट्रवादीतील कथित निष्ठावंतांमुळे युवा नेते पार्थ पवारांच्या विचारांची ‘कोंडी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Parth-Pawar.jpg)
- पार्थ पवारांच्या विचारांना चालणा देणा-या कार्यकर्त्यांवर अन्याय
- कर्तव्यतत्पर युवा कार्यकर्त्यांना आता संधी देण्याची गरज
पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे
आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणायची असेल तर युवानेते पार्थ पवार यांच्या विचाराने प्रभावीत झालेल्या युवा कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. अन्यथा गेली 20 वर्षे केवळ अजितदादांच्या पुढेमागे करून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत शहराच्या विकासात राष्ट्रवादीचेच योगदान असे म्हणत उसणे अवसान दाखविणा-या पदाधिका-यांवर विसंबून राहिल्यास राष्ट्रवादी रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पार्थ पवार यांच्या विचारांचे समर्थन करणा-या कार्यकर्त्यांना संधी दिल्यास पिंपरी पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
आगामी महापालिका निवडणूक अवघ्या दीड वर्षांवर आली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्तव्यतत्पर होऊन कामाला लागणे आपेक्षीत आहे. परंतु, इथे मात्र वेगळेच चित्र असून राष्ट्रवादीच्या कथीत निष्ठावंतांना विधानपरिषदेची स्वप्ने पडू लागली आहेत. पक्ष बाजुला ठेवून एकमेकांमध्ये ”मी कसा निष्ठावंत” हे दाखविण्याची जनू स्पर्धाच लागली आहे, असे चित्र दिसत आहे. असो…! परंतु, आता पिंपरी-चिंचवडची जनता त्याच-त्या पदाधिका-यांना वैतागलेली आहे. राष्ट्रवादीतून नव्या दमाचा नेता समोर येण्याची त्यांना आपेक्षा लागली आहे. अशातच युवानेते पार्थ पवार पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय झाल्याने सर्वांच्या मनामध्ये बदल होणार असल्याचे चित्र उमटत आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला सोबत न घेता नागरिकांचे प्रश्न घेऊन पार्थ पवार स्वतः अधिका-यांच्या भेटीगाठी घेत आहेत. ही जमेची बाजू असून युवा कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळत आहे.
कोव्हिड 19 च्या संदर्भात प्रशासनाच्या विस्कटलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. प्रदिर्घ चर्चा करून त्यांनी मुंबई आणि परदेशातील वैद्यकीय यंत्रणेच्या कामाचे दाखले देऊन पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना कोरोनातून कायमचे बाहेर कसे काढता येईल, यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील कोव्हिड बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांनी दोन-तीन संकल्पना मांडल्या. त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द डी. वाय. पाटील. रुग्णालय व्यवस्थापनाने दिला. परवा, ‘पीएमआरडीए’च्या अधिका-यांची भेट घेऊन त्यांनी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. राजकारणातील त्यांची सक्रियता पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरत आहे. आता पक्षातील युवा कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे. पार्थ पवार समर्थकांची फळी तयार झाल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचीच सत्ता येणार याची खात्री पक्षाचे जुनेजानते कार्यकर्ते सुध्दा देत आहेत.
दुस-या फळीतील युवा कार्यकर्त्यांना कधी न्याय मिळणार ?
पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे. आता वेळ आहे ती पार्थ पवार यांच्या विचारांचे समर्थन करणा-या कार्यकर्त्यांना चालणा देण्याची. पक्षातील युवा कार्यकर्त्यांच्या फळीमध्ये संदीप काटे यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. विजय गावडे, ज्ञानेश्वर कस्पटे, लाला चिंचवडे, उमेश काटे, प्रशांत सपकाळ, विशाल पवार, कुनाल थोपटे, शाम जगताप, तानाजी जवळकर हे सक्रिय कार्यकर्ते आहेत. भोसरी मतदार संघातून योगेश गवळी, आशिष बारणे, प्रतिक इंगळे, श्रीनिवास बिरादार, धनंजय भालेकर यांचे काम चांगले आहे. पिंपरी मतदार संघातून विशाल काळभोर, निलेश पांढारकर, नितीन दळवी यांची प्रतिमा स्वच्छ आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील युवानेते संदीप पवार हेसुद्धा सक्रीय कार्यकर्ते आहेत. हे सर्व कार्यकर्ते कर्तव्यतत्पर असून त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय झालेला आहे. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी त्यांची दखल घेत नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. पक्षातील वरीष्ठ पदाधिका-यांमुळेच पार्थ पवार यांच्या विचाराने प्रभावीत होणा-या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. परिणामी, पार्थ पवारांच्या विचारांचे खंडण होत आहे. या दुस-या फळीतील युवा कार्यकर्त्यांना आता पक्षाकडून संधी देण्याची गरज आहे, अशी कार्यकर्त्यांची आपेक्षा आहे.