उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळेच पिंपरी ते निगडी मेट्रोचे स्वप्न साकार – संजोग वाघेरे

पिंपरी / महाईन्यूज
स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेला जोडून पुढे पिंपरी ते निगडी या वाढीव मेट्रो मार्गिकेला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी ९४६ कोटी ७३ लाख एवढा खर्च येणार असून राज्य सरकार १७० कोटी ३ लाख इतका खर्चाचा भार उचलणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अधुरे ठेवलेले पिंपरी ते निगडी मेट्रोचे पिंपरी-चिंचवडकरांचे स्वप्न राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे व दूरदृष्टीच्या निर्णयामुळे साकार होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून अतिरिक्त मार्गिका तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. पुणे मेट्रो प्रकल्प राबविताना सुरूवातीला केवळ स्वारगेट ते पिंपरी असा मेट्रो मार्गाल मान्यता मिळाली आणि या मेट्रो मार्गाचे कामही सुरू आहे परंतु पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो करण्याची आग्रही मागणी होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड करांच्या मागणीला मूर्त रूप दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी निर्णय घेत निगडी पर्यंत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी केंद्र शासनाचे एकूण खर्चाच्या २० टक्के ऐवजी १० टक्के सहभाग दर्शविला. राज्य शासनाचा एकूण ७९ कोटी ४ लाख, तसेच ९० कोटी ६३ लाख रुपये परतफेड करावयाचे दुय्यम कर्ज असे एकूण १७० कोटी ३ लाख असा सहभाग असणार आहे.
केंद्र सरकारने खर्च देण्यात काहीशी असमर्थता दर्शवली. मात्र, राज्य सरकारने या खर्चाचा फार उचलण्याची तयारी दर्शवली. हा निर्णय अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून झाला असून त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे निखगडीपर्यंत मेट्रोचे स्वप्न साकार करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने स्वागत करण्यात येत असून अजित पवार यांचे आभार देखील मानले जात आहेत, असे संजोग वाघेरे-पाटील यांनी नमूद केले आहे.





