उच्चभ्रु प्राधिकरणात महिलांची सुरक्षा धोक्यात; अजित दादांकडे तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190407-WA0022.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांची दुचाकी रॅली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज उत्साहात काढण्यात आली. जागोजागी पार्थ पवार यांचा ताफा थांबवून महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी उद्योगनगरीत महिलांना असुरक्षीत वातावरण निर्माण झाल्याची व्यथा महिलांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यापुढे मांडली.
आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांची रॅली काचघर येथून पुढे आली तेव्हा महिलांनी त्यांचा ताफा थांबवून त्यांचे औक्षण केले. दरम्यान, ज्येष्ठ महिलांनी पार्थ पवार यांना कुंकम तिलक लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, त्यांनी स्थानिक पोलीस यंत्रणा खिळखिळी झाली असून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दिवसाढवळ्या ज्येष्ठ महिलांचा पाठलाग करून गळ्यातील चैन हिसकावली जात आहे. निगडी प्राधिकरण ही उच्चभ्रु वसाहत म्हणून ओळखली जाते. परंतु, या वसाहतीत गेल्या काही वर्षांपासून शेकडो दुचाक्या जाळल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांना मारहाण देखील करण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांची छेडछाड वाढली आहे. गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. परंतु, उकल होण्याचे प्रमाण घटले आहे, अशा व्यथा महिलांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यापुढे मांडल्या.
लोकसभा निवडणुकीत बदल घडविण्याचे तुमच्या हातात आहे. तुम्ही बदल घडवून आघाडीची सत्ता आल्यानंतर सर्व प्रश्न सोडवून सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याची हमी अजित पवार यांनी महिलांना दिली. रॅली दरम्यान, अजित पवार आणि पार्थ पवार यांनी व्यवसायीक, कामगार, तरुण, विद्यार्थी, महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.