इंद्रायणीनगरमध्ये पालिका बांधणार नवीन जलतरण तलाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/03/talav.jpg)
पिंपरी: भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवीन जलतरण तलाव बांधण्यात येणार आहे. हा जलतरण तलाव बांधण्यासाठी नऊ कोटी रूपये खर्च होणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने 28 फेब्रुवारीला आयत्यावेळी मान्यता दिली.
भोसरी येथील सहल केंद्रात महापालिकेचा जलतरण तलाव आहे. मात्र, तलावातील पाणी खराब होत असल्याने अनेकदा हा तलाव दुरूस्तीच्या कामासाठी बंद असतो. तसेच भोसरीतील लोकसंख्येच्या दृष्टीने हा तलाव अतिशय अपुरा पडतो. त्यामुळे इंद्रायणीनगर येथे जलतरण बांधण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, हा तलाव ‘पीपीपी’ तत्वावर बांधण्याचा निर्णय स्थायीने घेऊन हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता.
दरम्यान, स्थायी समितीने हा जलतरण तलाव ‘पीपीपी’ तत्वावर करण्याऐवजी प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगरमधील सेक्टर क्रमांक 6 जवळील डिस्ट्रिक्ट सेंटरमधील पोहण्याच्या तलावासाठी आरक्षण असलेल्या जागेवर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेची पालिकेने प्राधिकरणाकडे मागणी केली आहे. जागा ताब्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पालिकेमार्फेत जलतरण तलाव बांधण्यात येणार आहे. हे काम बी. के. खोसे या ठेकेदाराला देण्यात येणार असून त्यासाठी त्यांना 8 कोटी 97 लाख 95 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी जाता-जाता आयत्यावेळी मान्यता दिली.