आयुक्त म्हणतात, मी कोण ठरविणारा?, तो सभागृहाचा निर्णय!
![आयुक्त म्हणतात, मी कोण ठरविणारा?, तो सभागृहाचा निर्णय!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/10.jpg)
कर्मचा-यांना विमा पाॅलिसी की धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करायची, हा सभागृहाचा अधिकार
पिंपरी |महाईन्यूज|
धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करून कर्मचा-यांना विमा पॉलिसी लागू करण्यावरून सतत वाद सुरू आहे. पालिका कर्मचारी महासंघाने या निर्णयाला विरोध दर्शविला असताना कर्मचा-यांसाठी विमा योजना लागू होणार आहे, असे ठाम मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (दि.1) व्यक्त केले. तसेच कर्मचा-यांना विमा पाॅलिसी की धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करायची, हा सर्वस्वी सभागृहाचा अधिकार आहे. त्यामुळे कर्मचा-यांना धन्वंतरी की विमा लागू करायचा, हे मी कोण ठरविणारा? असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय राजकीय दबावामुळे नव्हे, तर पालिकेच्या बचतीसाठी हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी धन्वंतरी स्वास्थ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. मात्र, ही योजना बंद करून नवीन विमा पॉलिसी आणण्याचा घाट भाजप सत्ताधा-यांनी घातला. राजकीय दबावामुळे पालिका प्रशासनाने त्याची री ओढली. मात्र, कर्मचारी महासंघाने सुरुवातीपासून या धन्वंतरी योजनेला विरोध केला आहे. महासंघाचा व कर्मचा-यांचा विरोध असताना ही विमा योजना रेटण्याचा खटाटोप प्रशासन व सत्ताधा-यांकडून सुरू आहे.
या सगळ्यात आयुक्तांनी विमा योजना न राबविता धन्वंतरी चालू ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे महासंघाने म्हटले होते. मात्र, आयुक्तांनी भूमिका बदलली असून विमा योजना लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धन्वंतरी योजना बंद झालेली आहे. त्यात अनेक त्रृटी होत्या. विमा योजनेमुळे पालिकेची बचत होणार असून कर्मचा-यांना फायदा होईल. हे त्यांना समजावून दिले आहे. विमा योजना हिताची असल्याने ती राबविली जात असल्याचे ते म्हणाले.
महापालिका सर्वसाधारण सभेत धन्वंतरी योजना बंद करून विमा योजना राबविण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे. सत्ताधा-यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही केली जात असून त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव केला जात असल्याची कबुली यावेळी आयुक्त हर्डीकर यांनी दिली. मात्र, धन्वंतरी लागू करण्याबाबत झालेल्या बैठका, त्यांनी दिलेले आश्वासन व स्थायी समितीच्या ठरावाबाबत त्यांनी नेमके उत्तर दिले नाही.