आयुक्तांची भूमिका संशयास्पद; ‘मलई’दार जागेसाठी ‘कोविड’ सेंटरची जबाबदारी काढली
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भोसरी रुग्णालयातील कोविड – 19 जबाबदारी काढून एका अर्जावर डॉ. लक्ष्मण गोफणे यांची प्रभारी आरोग्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे. आयुक्तांनी मोठ्या तत्परतेने हा बदलीचा आदेश काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. लक्ष्मण गोफणे हे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना केवळ मुख्य आरोग्य अधिका-यांच्या मर्जीतील असल्या कारणाने आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी या पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता.
शहरात करोनाचे रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर डॉ. गोफणे यांना भोसरी रुग्णालयातील कोविड सेंटर प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्याच्याकडून आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार काढण्यात आला होता. त्या जागेवर बेंडाळे यांच्याकडे आरोग्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. बेंडाळे हे सहायक आरोग्य अधिकारी पदाचे काम पाहून कार्यकारी अधिकारी पदाचेही काम पहात होते.
गेली तीन चार महिने कोविड सेंटरची जबाबदारी सांभाळताना डाॅ. गोफणे यांनी अचानकपणे गत आठवड्यात आपली पूर्वीच्या ठिकाणी बदली करावी, असा अर्ज करताच त्यावर तात्काळ कार्यवाही करत गोफणे यांना पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. शहरात रोजच शेकडोच्या संख्येत करोनाचे रुग्ण वाढत आहेत, शहरातील रुग्णांच्या संख्येने सात हजारांची संख्या ओलांडली आहे, डॉक्टरांची कमतरता महापालिकेला भासत असताना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची इतक्या तत्परतेने बदली करण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आयुक्तांची ही कृती पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.