आमदार महेश लांडगे यांनी सहकुटुंब पारंपारिक पद्धतीने साजरा केला ‘बैलपोळा’
शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैलपोळा. आज म्हणजे 17 सप्टेंबरला शेतकऱ्यांचा हाच लाडका सण साजरा केला जातो. मात्र यंदा सर्व सणांप्रमाणे बैल पोळा या सणावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे बळीराजाला यंदाचा बैलपोळा हा घऱच्याघरीच साजरा करावा लागणार आहे. याच प्रमाणे पिंपरी-चिंचवडचे भाजपाचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील सहकुटुंब पारंपारिक पद्धतीने आजचा बैल पोळ्याचा दिवस आपल्या शेतामध्येच शेलपिंपळगाव येथे साजरा केला.
सध्या कोरोनाच्या काळात नेहमीप्रमाणे बैलांना सजवणं जमले नसले तरी गुलाबी रंगाच्या टुमदार गोंड्यांनी बैलांची शिंगे सजवली होती .तर, फुलांच्या माळांनी सर्जा-राजाची ही जोडी अजूनच खुलून दिसत होती. बैलांची पुजा करून महेश लांडगे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच प्रत्येकाने यंदाचा बैलपोळा घरच्याघरीच साजरा करावा असं आवाहनही केलं आहे.
ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीत बैलपोळ्याला खूप महत्त्व आहे.यादिवशी बैलांची खांद शेकणी करून “आज आवतन घ्या, उद्या जेवायला या”, अशी साद शेतकरी बैलांना घालून आमंत्रण देण्यात येते. परंतु कोरोनामुळे मोठ्या थाटामाटात साजरा होणारा बैलपोळा सण घरीच साजरा करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.तरी प्रत्येक शेतकऱ्यांने त्याला जमेल त्या पद्धतिने आपल्या सर्जा-राजाची पुजा करून त्यांचे आभार नक्कीच मानले आहेत. कारण कोरोना असो वा दुसरे कोणतेही संकट शेतकऱ्याचा हा मित्र मात्र नेहमी त्याच्या सोबती असतो आणि कायम राहणार.