आमदार महेश लांडगे म्हणतात… माझा वाढदिवस कोरोना योद्धांना समर्पित!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/mahesh-langde-1200.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे भाजप शहराध्यक्ष, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी आपला वाढदिवस हा कोरोना योद्धयांना समर्पित केला आहे. याबाबत त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट लिहिली आहे.
आमदार लांडगे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘माझे परिचित, सहकारी सर्वच 27 नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस साजरा करण्यास उत्सूक असतात. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिकट बनली आहे.
निकटवर्ती कोरोनाने हिरावून नेण्याचे माझ्यासारखे वेदनादायक अनुभव तुमचेही असतील, पण तरीही आपण एकमेकांना धीर देत या संकटाचा सामना करत आहोत. अशा परिस्थितीत यावर्षी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही.
परंतु, आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत, नियमांचे पालन करत आपल्या परिसरातील गरजू नागरिकांना मदत केल्यास मला माझा वाढदिवस साजरा झाल्याचे निश्चितच समाधान मिळेल.
यावर्षीचा माझा वाढदिवस कोरोना योद्धयांना समर्पित करण्याचे ठरवले आहे. तेव्हा वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग लावू नयेत. तसेच कार्यक्रम, अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करु नये. सोशल मीडियाद्वारे मला आपले शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावेत, ही विनंती !’