‘आधार’च्या नावावर पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांची होतेय फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/10-2.jpg)
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
शहरामध्ये विविध ठिकाणी आधार नोंदणीसाठी अधिकृत 16 केंद्रे उभारण्यात आली आहे. मात्र या केंद्राची संख्या अपुरी होत असल्याने आधारच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याची संख्या वाढली आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी दुकाने मांडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांकडून नवीन आधार नोंदणीसाठी तसेच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी जादा पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. मात्र यावर प्रशासनाचा वचक नसल्याने नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या ब आणि ग प्रभागामध्ये प्रत्येकी दोन आधार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तसेच इतर प्रभागांमध्ये एक-एक आधार केंद्र आहे. महापालिका मुख्यालयात ही दोन केंद्रे उभारण्यात आली आहे. या ठिकाणी आधार कार्ड काढण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अधिकृत केंद्रांमध्ये नवीन आधार नोंदणी करायची असेल तर ती मोफत असते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर प्रत्येकी पन्नास रुपये शुल्क आकारले जाते. मात्र काहींनी दुकाने थाटून नागरिकांकडून जादा पैसे उकाळण्याचा धंदा मांडला आहे. भोसरी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यांने अशा प्रकारे व्यवसाय मांडल्याचे समोर आले आहे.
येथील नागरिकांकडून नवीन आधार कार्ड काढण्यासाठी शंभर रुपये प्रमाणे शुल्क आकारले जात आहे. तर दुरुस्ती करण्यासाठी दोनशे रुपये शुल्क घेतले जाते. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी मोफत सुविधा असूनही नागरिकांकडून अशाप्रकारे पैसे लाटण्याचा गोरखधंदा सुरू आहे. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.