आदित्य बिर्ला नर्सिंग स्टाफ आंदोलनास शहर काँग्रेसचा पाठिंबा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20200809-WA0021.jpg)
पिंपरी – गेले दोन दिवस आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफचे सुरू असलेल्या आंदोलनास आज शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या प्रशासनासमोर मांडुन या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, पिंपरी चिंचवड सेवादल अध्यक्ष मकरधवज यादव, सुनील राऊत, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, शहर युवक काँग्रेसचे चंद्रशेखर जाधव, कुंदन कसबे, गौरव चौधरी आधी पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील सर्वात मोठे असलेले आदित्य बिर्ला हॉस्पिटल विरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी वाढत आहेत, कोरोनाच्या या काळामध्ये हॉस्पिटल प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यामध्ये ज्या परिचारिका, आरोग्य सेविका या कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालुन रुग्णांची सेवा करीत आहेत त्यांनाच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने सेविकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
स्टाफ प्रतिनिधी शीना शिलॉंग यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले, अनेक दिवसांपासून स्टाफ नर्स या आपली शुल्लक मागण्या प्रशासनाकडे मागणी करीत होते. 25 रुग्णामागे 2 स्टाफ असल्याने सेविकांवर ताण येत आहे, तसेच स्टाफला बाहेरील पौष्टिक खाद्यपदार्थ देखील आत दिले जात नाही, 12 तास 7 दिवस रात्र सतत काम करून कोविड भत्ता दिला जात नाही. कॅन्टीनच्या जेवणाचा दर्जा तसेच स्टाफला हीन दर्जाची वागणूक दिली जाते. अशा अनेक कारणांमुळे सर्वांना मानसिक त्रास होतो आहे. प्रशासन प्रमुख रेखा दुबे या हुकूमशाही पद्धतीने हॉस्पिटलचा कारभार चालवितात, असा आरोप सर्वजण करीत आहेत.
या सर्व नर्सिंग स्टाफची मागणी घेऊन सचिन साठे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांची भेट घेऊन मागण्या मान्य करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. या स्टाफवर अन्याय झाल्यास शहर काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावर रेखा दुबे यांनी आम्ही स्टाफ प्रतिनिधी यांच्यासोबत बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.