आता अधिका-यांची गय नाही, महापौरांच्या आदेशानंतर आयुक्त कारवाईच्या तयारीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Shravan-Hardikar-PCMC-New-Commissnor-04-1.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे, मुता-यांची स्वच्छता, कचरा उचलणे, साफसफाई, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटरच्या स्वच्छतेचे काम अधिकारी अथवा कर्मचा-यांनी तातडीने करावे. प्रभागातील आरोग्य विषयक कामे करण्यात बेजबाबदरपणा आढळल्यास किंवा हयगल केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा आज महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत प्रभागातील आरोग्य विषयक समस्या भेडसावत असल्याचा संताप सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यावर व्यक्त केला. मुता-यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे नादुरूस्त अवस्थेत आहेत. वापरण्यासाठी पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने उघड्यावर शौचास बसावे लागते. अधिका-यांकडे तक्रार केल्यास ठेकेदाराकडे बोट दाखवले जाते. नगरसेवकांनी नेमकी तक्रार करायची कोणाकडे?. तसेच, प्रभागातील कच-याची समस्या जटील बनली आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही. आजही काही ठिकाणच्या कचरा कुंड्या ओव्हर फ्लो झाल्याचे पहायला मिळत आहे. हे सर्व प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे होत असल्याचा ठपका नगरसेवकांनी आयुक्तांवर ठेवला.
त्यावर ज्या नगरसेवकांच्या प्रभागात कचरा, स्वच्छतागृहे, ड्रेनेज अशा तत्सम समस्या असतील त्यांनी तत्काळ फोटो काळून मला व्हॉट्सअपवर पाठवावा. जर त्यावर कारवाई झाली नाही, तर संबंधित अधिकारी अथवा कर्मचा-याला निलंबित करण्याचे आदेश महापौर राहूल जाधव यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना दिले. त्यावर आयुक्त हार्डीकर यांनी तडकाफडकी सभागृहातच अधिका-यांना आणि कर्मचा-यांना हे आदेश सुनावले. आरोग्य विषयक समस्यांचा जर वेळेत निपटारा न झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई होईल. पाणी पुरवठा विभागाने पाणी जपून वापरण्याच्या सूचना कराव्यात. धरणात 15 टक्केच पाणीसाठा आहे. सार्वजनिक शौचालयात एसटीपीचे पाणी वापरण्यात यावेत, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.