अभिनेत्री रेखा यांचा खासदार निधी ; चुकीच्या खाते क्रमांकामूळे निधी मिळण्यास विलंब
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/download-4.jpg)
पिंपरी – कासारवाडी येथे उभारण्यात येणा-या शाळा इमारतीकरिता प्रसिद्ध अभिनेत्री आणि राज्यसभा सदस्या रेखा गणेशन यांनी खासदार निधीतून दोन कोटी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, बँक ऑफ बडोदाच्या पिंपरी शाखेकडून हा निधी जमा करण्यासाठी दिलेला खाते क्रमांक चुकीचा देण्यात आला होता. ही चूक लक्षात येताच, घाईघाइने नवीन बँक खाते क्रमांक बॅंकेने कळविला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाशी पुन्हा पत्रव्यवहार करून हा नवीन खाते क्रमांक कळविण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढविली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवडी येथील सर्व्हे क्र. 420 येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या आवारात पाच मजली प्रशस्त शाळा बांधली जाणार आहे. या शाळेतील मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी अभिनेत्री रेखा यांनी खासदार निधीमधून दोन कोटी 25 लाखांचा निधी आरटीजीएसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला होता. याकरिता महापालिका आयुक्तांच्या नावे नव्याने बॅंक उघडण्याची कार्यवाही बॅंक ऑफ बडोदाच्या पिंपरी शाखेत करण्यात आली.
यापूर्वी 07630100020001 दिला होता. हा खाते क्रमांक देताना यामध्ये टायपिंग मिस्टेक झाली होती. त्यामुळे आरटीजीएसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला निधी या खात्यात जमा होऊ शकला नाही. मात्र, ही चूक लक्षात येताच, बॅंक व्यवस्थापनाने नव्याने 07230200020001 हा नवा खाते क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. एका आकड्याच्या टायपिंग मिस्टेकमुळे निधी खात्यात जमा होण्यास विलंब झाला. मात्र, त्यानंतर बॅंकेचा नवा खाते क्रमांक कळविण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांना पुणे जिल्हा नियोजन समितीशी (जिल्हाधिकारी कार्यालय) नव्याने पत्रव्यहार करावा लागला आहे.
नगरसेवक श्याम लांडे म्हणाले, “या निधीसाठी मी पाठपुरावा केला होता. माझ्या पाठपुराव्याला यश आले असून रेखा यांना निधी दिला आहे. इमारतीच्या उद्घाटनाला अभिनेत्री रेखा उपस्थित राहणार आहेत”