अभिनेत्री रेखा गणेशन यांच्या खासदार फंडातून कासारवाडी शाळेच्या बांधकामास निधी प्राप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/4Pimpri_20School.jpg)
नगरसेवक शाम लांडे यांच्या पाठपुराव्यामुळे निधी प्राप्त
पिंपरी (महा ई न्यूज) – माजी खासदार अभिनेत्री रेखा गणेशन यांनी दिलेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. त्या निधीतील 2 कोटी 25 लाखाचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. दरम्यान, शाळेच्या संपुर्ण बांधकामास सुमारे 14 कोटी रुपये खर्च होणार असून पिंपरी-चिंचवड महापालिका ‘पीपीपी मॉडेल’ची ही शाळा बांधून इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा माजी खासदार रेखा यांनी तीन कोटी रुपये निधी मंजूर केल्याचे पत्र जानेवारी 2018 रोजी दिले होते. याबाबत नगरसेवक शाम लांडे यांनी शाळेसाठी निधी मिळविण्यासाठी जोमाने पाठपुरावा केला. त्याचे फळ म्हणून रेखा यांनी तीन कोटी रुपये दिले. लांडे यांच्या प्रभागातच ही सर्व सुविधांनी युक्त अशी शाळा उभी राहत आहे. या पाच मजली शाळेत प्रत्येक मजल्यावर मुले, मुली आणि शिक्षक यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणार आहे. तसेच ई लर्निंगसह सर्व सुविधाही असतील. पैशांअभावी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना शिक्षण देऊ न शकणाऱ्या पालकांची या शाळेमुळे मोठी सोय होणार असून त्यांच्या पाल्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण आता मोफत मिळेल, असे नगरसेवक शाम लांडे यांनी सांगितले.
दरम्यान, आकांक्षा संस्था आणि पिंपरी महापालिकेच्या वतीने ही शाळा उभारली जात आहे. कासारवाडी येथील छत्रपती शाहूमहाराज विद्यामंदिर या पालिकेच्या मराठी शाळेशेजारी ही नवी इंग्रजीची ‘पीपीपी मॉडेल’ची शाळा उभी राहत आहे. शाळा इमारत मुलांना दप्तर, पुस्तके आदी सुविधा पालिका पुरविणार आहे. तर, शिक्षणाची बाजू ‘आकांक्षा’ सांभाळणार आहे. या शाळेच्या इमारतीसाठी महापालिकेच्या लेखा विभागाकडे 31 आॅक्टोबर 2018 पहिला हप्ता म्हणून 2 कोटी 25 लाख रुपये एवढी रक्कम जमा झाला आहे. तसेच निधीचा दुसरा व शेवटचा हप्ता शाळेचे बांधकाम पुर्ण होवून पुर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर देण्यात येणार आहे, असेही लांडे यांनी सांगितले.