अबब… एक लोंखडी बेंच पाच हजार रुपयांना ; खरेदीत सावळा गोंधळ
- लहान-मोठ्या बेंचेस खरेदीत शंभर रुपयांची तफावत
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी बेंचेस खरेदीस निविदा प्रक्रिया राबिवली. लहान-मोठ्या असे एकूण 1160 बेंचेस खरेदी करण्यात येणार होते. त्यात लहान व मोठ्या बेंचेस खरेदीत अवघ्या शंभर रुपयाचा अत्यल्प फरक असून बेंचेस खरेदीत सावळा गोंधळ असल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शालेय बेंचेस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून दर मागविले होते. सदर निविदेत 6 निविदाकारांनी सहभाग घेतला. त्यापैकी तांत्रिकदृष्ट्या दोन निविदाकार पात्र ठरले. त्यातील मे. शिवसमर्थ एंटरप्रायजेस यांचे लहान लोखंडी बेंचेस प्रति नग दर 4896 रुपये आणि मोठे लोंखडी बेंचेस प्रति नगर दर 4950 रुपये असे एकूण 1160 नग बेंचेसच्या प्राप्त झालेल्या दरानूसार 56 लाख 96 हजार 640 रुपये आहेत. तर मे. निर्मिती इंजिनिअरिंग काॅपोरेशनने 65 लाख 38 हजार 440 रुपये दर प्राप्त झाले होते. त्यातील मे. शिवसमर्थ एंटरप्रायझेसचे महापालिकेच्या 71 लाख 40 हजार या अंदाजपत्रकापेक्षा कमी व लघुत्तम दर प्राप्त झाले आहे.
शालेय बेंचेस खरेदीसाठी येणा-या 56 लाख 96 हजार 640 रुपये खर्चास आणि मे. शिवसमर्थ एंटरप्रायझेस यांचेबरोबर करारनामा करुन घेण्यास मान्यता देण्यात आली. परंतू, सदरील लहान बेंचेस खरेदीचे नग अधिक असून ते सुमारे पाच हजार रुपयास प्रति नग खरेदी करण्यात आलेले आहेत. मोठ्या आणि लहान बेंचेस खरेदीत केवळ शंभर रुपये दरांचा फरक दिसत आहे. त्यामुळे सदरील खरेदीत सावळा गोंधळ झाला असून त्या खरेदीकडे स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांनी डोळे झाकून मंजुरी दिली आहे.