अनधिकृत बांधकाम, पाणी टंचाई नका बोलू – महापाैरांची नगरसेवकाला सूचना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/pcmc-water-4.jpg)
- महासभा तहकूबीची मांडा सुचना, असा दिला सल्ला
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात पाणी गळती आणि अनधिकृत नळ कनेक्शन रोखण्यास पाणी पुरवठा विभागाला अपयश आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा बांधकाम अधिका-यांनी बाऊ केल्याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. यावर भाजप नगरसेवक नामदेव ढाके महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत होते, परंतू, महापाैरांनी त्यांना तुम्ही सुचना मांडा, अनधिकृत बांधकाम, पाणी टंचाईवर बोलू नका, अशा सुचना दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा आज (20 मे ) घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर राहूल जाधव होते. महापालिकेच्या सभेत चार विषय समित्यांची सदस्य पदावर नगरसेवकांच्या निवडी करण्यात आल्या. त्यानंतर नगरसेवक नामदेव ढाके यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामासह पाणी टंचाईवर भाष्य केले. महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला.
त्यानंतर महापाैर राहूल जाधव यांनी तुम्ही अनधिकृत बांधकाम आणि पाणी टंचाईवर बोलू नका, तुम्ही लवकरच सुचना मांडा, असे सांगून त्यांना त्या प्रश्नावर बोलण्यास थांबविले. त्यामुळे अनधिकृत बांधकाम आणि पाणी टंचाई प्रश्नावर अन्य नगरसेवकांना बोलायचे होते. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.