अधिका-यांच्या बेजबाबदारपणावर क्रिडा सभापतींचा संताप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/300285_128392060596498_734482928_n.jpg)
- बैठकीत मागितली कामाची माहिती
पिंपरी – महापालिका हद्दीत क्रिडा, कला, सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विषयांतील निर्णय घेण्यासाठी संयुक्तीक क्रिडा-कला-सांस्कृतीक समिती गठीत केली असताना समितीसमोर केवळ क्रिडा क्षेत्रातील कामकाजविषयक प्रस्ताव आणले जातात. यापुढे सांस्कृतीक आणि कला क्षेत्रातील विषयांची देखील माहिती समितीच्या बैठकीत मांडण्यात यावी, अशी तंबी सभापती संजय नेवाळे यांनी क्रिडा अधिका-यांना समितीच्या बैठकीत दिले.
सभापती संजय नेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी (दि. 24) क्रिडा-कला-सांस्कृतिक समितीची चालू आर्थिक वर्षातील पहिली बैठक पार पडली. यावेळी सभापती नेवाळे यांनी क्रिडा विभागातील अधिका-यांच्या बेजबाबदार कामकाजाचा खरपूस समाचार घेतला. पालिकेतर्फे खेळाडू दत्तक योजना राबविली जाते. आजअखेर 150 दत्तक खेळाडूंवर पालिकेने खर्च केला आहे. त्यापैकी एखादा खेळाडू क्रिडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे का?, असा प्रश्न नेवाळे यांनी अधिका-यांना विचारला. त्यावर अधिका-यांची पाचावर धारण बसली. तातडीने याबाबतची माहिती पुढच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.
सध्या जलतरण तलावावर जीवरक्षक नाहीत. तेथील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याची माहिती सादर करावी. तसेच, एकूण पंधरा क्रिडा मैदाने वापरात नाहीत. ती कशामुळे बंद ठेवली आहेत, याची माहिती सादर करण्याच्या सूचना नेवाळे यांनी दिल्या आहेत.