अधिकारी संभाजी ऐवलेंना पदोन्नती कधी? आमदार अण्णा बनसोडेंचे आयुक्तांना ‘स्मरणपत्र’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/pcmc-4.jpg)
- दिव्यांग बांधवांच्या हितासाठी ऐवले यांची पदोन्नती फायदेशीर
- आयुक्तांनी यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा – आमदार बनसोडे
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या पदोन्नतीचा ठराव मंजूर असताना अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ऐवले यांना पदोन्नती देण्याची मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे 8 डिसेंबर 2012 रोजी केली. त्याची दखल आयुक्तांनी आजतागायत घेतलेली नाही. आता पुन्हा आमदार बनसोडे यांनी आयुक्तांना यासंदर्भात स्मरणपत्र पाठविले आहे. त्यावर आमदार बनसोडे यांची मागणी आयुक्त मार्गी लावतील अशी आपेक्षा व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीत ठराव क्रमांक 499 मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार दिव्यांग बांधवांसाठीच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी या विभागाची जबाबदारी एका उपायुक्तावर सोपविण्यात यावी. त्याची माहिती शासनाला कळवावी, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी कळविण्यात आले. प्रशासन विभागाकडील सहायक आयुक्त यांचे पत्र क्र. प्रशा / 07/कावि/449/2019 25/06/2019 च्या पत्रानुसार 30 जुलै 2016 अन्वये शासनाला पाठविण्यात आलेल्या सेवा नियम 2016 व आकृतीबंध यामध्ये एकूण 8 उपायुक्त नामाची पदे निर्माण केली. त्यामध्ये 1 समाजविकास विभागासाठी 1 उपायुक्त नवीन पदाचा समावेश आहे.
दिव्यांग बांधवांचे विषय हाताळण्यासाठी समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले गट ब या पदावर 2014 पासून नागरवस्ती विकास योजना विभागात कार्यरत आहेत. याच विभागात त्यांची 21 वर्ष सेवा पूर्ण झाली. पालिकेत त्यांची एकूण 33 वर्ष सेवा पूर्ण झाली. त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता व सेवानिवृत्ती दिनांक 31/05/2021 याचा विचार करून आदेश क्र. लेखा/1अ/कावि/796/2019 दि. 29/06/2019 अन्वये समाज विकास अधिकारी पदाचे वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली. या पदास सुधारित वेतनश्रणी 9 हजार 300 ते 34 हजार 800 ग्रेड पे 5 हजार 400 लागू केला. ऐवले हे एकमेव अधिकारी या पदासाठीची निर्धारित अर्हता धारण करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दिव्यांग बांधवांची विषय हाताळण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी. वेतन श्रेणी रक्कम 15 हजार 600 ते 39 हजार 100 ग्रेड पे 6 हजार 600 असलेल्या सहायक आयुक्त पदावर ऐवले यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 45 (4) मधील तरतुदीनुसार अवर सचिन महाराष्ट्र शासन नगर विकास यांच्याकडील दि. 14 नोव्हेंबर 2017 च्या परिपत्रकानुसार पदोन्नती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही.
आता तरी ऐवलेंच्या पदोन्नतीची आयुक्त दखल घेतील का
आयुक्त हर्डीकर यांनी यासंदर्भात निर्णय न घेतल्यामुळे ऐवले या पदोन्नतीपासून वंचित राहिले आहे. त्यावर आमदार अण्णा बनसोडे यांनी 8 डिसेंबर 2020 रोजी आयुक्तांना निवेदन देऊन पदोन्नतीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. त्याला पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला. तरी आयुक्तांनी ऐवले यांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लावलेला नाही. त्यावर पुन्हा आमदार बनसोडे यांनी आयुक्तांना यासंदर्भात स्मरणपत्र पाठविले आहे. आता तरी ऐवले यांच्या पदोन्नतीची आयुक्त दखल घेतील का, याची आपेक्षा लागली आहे.