ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी मेट्रोच्या कामास सुरुवात

पिंपरी-चिंचवडकरांची स्वप्नपूर्ती…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या रखडलेल्या मेट्रोच्या कामाला अखेर शनिवार (दि.२५) सुरुवात झाली आहे. निगडी येथील टिळक चौकाजवळ मेट्रोकामासाठी लोखंडी बॅरिकेड्स टाकून खोदकाम सुरू झाले आहे. अनेक दिवसांपासून हे काम रखडले होते.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर यांना जोडणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ते सिव्हील कोर्ट (शिवाजीनगर) या दरम्यान मेट्रोची प्रवासीसेवा सुरू झालेली आहे. सिव्हील कोर्टपासून स्वारगेटपर्यंत मेट्रोची प्रवासीसेवा अद्याप सुरू झालेली नाही. दरम्यान, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकतील प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी (भक्ती- शक्ती चौक) या मार्गाच्या विस्तारीकरणाची निविदा महामेट्रोने लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध करून त्यासाठी मंजुरी घेतली होती. त्यानुसार, हे काम रेल विकास निगम लिमिटेड यांना देण्यात आलेले आहे.

हा मार्ग साडेचार किलोमीटरचा असणार..
पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी (भक्ती-शक्ती चौक) या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारने दिनांक २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी मान्यता दिली. या मार्गाची एकूण लांबी ४.५१९ किलो मीटर आहे. या मार्गिकेचा एकूण खर्च ९१०.१८ कोटी इतका आहे. या संपूर्ण विस्तारित मार्गाचे काम ३ वर्षे आणि ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. या मार्गिकेचे बांधकाम स्वीकृती पत्र मिळाल्यापासून १३० आठवड्यांत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

या मार्गावर चार स्थानके..
हा संपूर्ण मार्ग उन्नत आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक अशी ४ स्थानके असणार आहेत. महापालिका स्थानक ते चिंचवड स्थानकातील अंतर १.४६३ किमी आहे. चिंचवड ते आकुर्डी स्थानकातील अंतर १.६५१ किमी, आकुर्डी ते निगडी अंतर १.०६२ किमी आणि निगडी ते भक्ती-शक्ती चौक अंतर ९७५ मीटर असणार आहे. हे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी व्हायाडक्ट बांधण्याबरोबरच ठेकेदाराला स्थानकाचे कोनकोर्स व फलाटाच्या स्लॅबचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे स्थानकाच्या बांधणीचा वेळ वाचणार आहे.

पिंपरी-चिंचवडकरांची स्वप्नपूर्ती…

‘‘पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रोचे काम पिंपरीपर्यंत ज्या वेगात सुरू आहे. त्याच वेगात निगडीपर्यंत होईल..’’ असे आश्वासन राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. आज निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली. ही पिंपरी-चिंचवडकरांची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची यानिमित्ताने आठवण झाली. मा. देवेंद्रजींनी दिलेला शब्द खरा ठरला. पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. यासोबतच आगामी काळात हिंजवडी-वाकड-पिंपळे सौदागर- भोसरी-चाकण असा मेट्रो विस्तारासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने राज्य व केंद्रातील महायुती सरकारचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button