breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिचवड महापालिका दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार पेटी भेट देणार!

पिंपरी: आषाढीवारी पालखी सोहळ्या निमित्ताने शहरात येणाऱ्या वारकरी बांधवांना आषाढीवारी यात्रा सुलभ व आरोग्यदायी व्हावी यासाठी दिंडी प्रमुखांना महापालिकेच्या वतीने प्रथमोपचार पेटी व संपर्क माहिती पुस्तिका भेट देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.

दि.२१ जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन व २२ जून २०२२ रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज  यांच्या पालखीचे आगमन शहरात होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. आषाढीवारी पालखी यात्रा सुलभ, आरोग्यदायी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रथमोपचार पेटीचे अनावरण आणि संपर्क माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे उपआयुक्त रविकिरण घोडके, विठ्ठल जोशी, सचिन ढोले, मुख्य अग्नीशमन अधिकारी किरण गावडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.   प्रथमोपचार पेटीमध्ये थंडी तापाच्या गोळ्या, सर्दी, खोकल्याच्या गोळ्या, मलम, बँडेज, सावलोन लिक़्विड, ओ.आर.एस. पावडर, अशा १५ वस्तूंचा समावेश आहे.

दरम्यान, आयुक्त पाटील यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याचे टँकर यांना मार्गक्रमण करण्यासाठी हिरवा झेंडा दाखविला.

आयुक्त पाटील म्हणाले यंदाच्या पालखी सोहळ्या दरम्यान वारक-यांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा पुरविणे व वारी प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपुरक करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज असून शहरात महापालिकेच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी आणि मुक्कामाच्या ठिकाणी पुरुष व स्त्रियांकरिता स्वतंत्र फिरते शौचालयांची व्यवस्था, आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारक-यांसाठी महापालिकेच्या शाळा व खाजगी शाळा उपलब्ध करून देणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पालखीमार्गावर खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी स्टॉलधारकांना परवाने देण्याची कार्यवाही,  कचरा संकलनासाठी घंटागाडी उभ्या करण्याची व्यवस्था, महिलांसाठी ठिकठिकाणी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीनची सोय करण्यात आलेली आहे. पालखी सोहळ्याच्या कालावधीत वारक-यांसाठी महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये २४ तास मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावर फिरता दवाखाना आणि तसेच वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका, विविध यंत्रणांसाठी मोबाईल बसची  व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त पाटील यांनी यावेळी दिली.

पालखी मार्गावरील सर्व रस्ते सुव्यवस्थित व खड्डेमुक्त करण्यात आले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आलेली आहेत. पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष  आणि पालखी मार्गावर २०० सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवण्यात आले आहेत. त्यांचे थेट प्रक्षेपण व रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी वॉकी टॉकी संच, वायरलेस संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी आणि पालखी मार्गावर फिरते कंट्रोलरूम उभारण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने २ ड्रोन ची व्यवस्था करण्यात  आहे, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांचे सहकार्य मिळणार आहे.  पालखी सोहळ्याकरीता मुख्य समन्वयक, समन्वयक, ग्रुप कमांडर अशा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पालखी सोहळ्याचे नियोजनाबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पालखी सोहळ्यात स्वच्छाग्रह चित्ररथ असणार आहे. यावेळी स्वच्छतेबाबत विविध चित्रफित व पथनाट्य याद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button