ताज्या घडामोडीराष्ट्रिय

आवाजाची मर्यादा पाळू, मात्र भोंगे हटवणार नाही; अंबरनाथमध्ये मुस्लीम समाजाची भूमिका

अंबरनाथ |  राज्यात सध्या भोंगे आणि हनुमान चालिसावरून राजकारण तापत आहे. त्यामुळे येत्या रमजान ईद या सणाच्या काळात शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मशिद आणि मंदिरावरील भोंग्यांच्या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी सोमवारी पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मशिदीवरील भोंगे काढणार नसल्याची भूमिका शहरातील मुस्लीम संघटनांनी घेतली. मात्र भोंग्याबाबत आवाजाची मर्यादा तसेच न्यायालय आणि सरकारच्या आदेशाचे आम्ही पालन करू, असं आश्वासनही यावेळी बैठकीत मुस्लीम संघटनाकडून देण्यात आले आहे.

अंबरनाथ शहरात मुस्लीम समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण तापत असून ३ मे रोजी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. रमजान ईदच्या दिवशी शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये तसेच न्यायालय आणि सरकारच्या आदेशानुसार मशीद आणि मंदिरावरील भोंग्यांबाबत विचार विनिमय करण्यासाठी सोमवारी अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची संयुक्त बैठक बोलावली होती.

 

या बैठकीला शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर, भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील आरपीआयचे ज्येष्ठ नेते शाम गायकवाड तसेच मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर अंबरनाथमध्ये सर्वधर्मिय नागरिक गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने राहत असून आजूबाजूच्या शहरांचा इतिहास पाहता तेथे अनेकवेळा जातीय तेढ निर्माण झाली असली तरी अंबरनाथमध्ये असा प्रकार गेल्या अनेक वर्षांत झाला नसल्याचे उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे यापुढेही सर्व धर्मियांचे सणोत्सव येथे एकमेकांना सहकार्य करत साजरे केले जातील. यापुढेही धार्मिक तेढ शहरात निर्माण होणार नाही यासाठी ईद असो वा हिंदू धार्मिक सण शांततेत पार पडण्यासाठी राजकीय पक्ष आणि संघटना प्रयत्न करतील. तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी पोलिसांनाही राजकीय पक्ष आणि सर्व जातीच्या संघटनांचे सहकार्य असेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.

शहरातील पश्चिम भागात बहुतांश मशिदी आहेत. मात्र, मशिदीवरील भोंगे आम्ही काढणार नसल्याची ठाम भूमिका यावेळी मुस्लीम संघटनांनी या बैठकीत घेतली. न्यायालय आणि सरकारच्या आदेशाचे पालन करत आवाजाची मर्यादा पाळणार असल्याचे आश्वासनही यावेळी मुस्लीम संघटनांकडून पोलिसांना देण्यात आले आहे.

‘मशिद आणि मंदिरावरील भोंगे आणि आवाजाच्या मर्यादेसह शहरात येत्या सणोत्सव काळात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखावी, यासाठी सर्वपक्षीय आणि धर्मियांसोबत शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरात कुठलीही धार्मिक तेढ आणि कायदा सुव्यवस्था न बिघडवता न्यायालय आणि सरकारच्या आदेशाचे पालन करण्याबाबत आश्वासन दिले आहे,’ असं अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button